उन्हाळ्यापूर्वीच पाणीटंचाईच्या झळा; नांदेड, धायरी परिसरातील चित्र

दत्तात्रय नलावडे
खडकवासला : Bharat Live News Media वृत्तसेवा : उन्हाळा सुरू होण्याआधीच सिंहगड रस्त्यावरील नांदेड, धायरी, किरकटवाडी, कोल्हेवाडी परिसरात पाणीटंचाईच्या झळा सुरू झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. दरम्यान, महापालिकेत नव्याने समाविष्ट केलेल्या सिंहगड रस्ता परिसरातील गावांत सुधारित विस्तारित पाणीपुरवठा योजना राबविण्याची कार्यवाही प्रशासनाकडून सुरू आहे. नांदेड येथे ग्रामपंचायत काळातील पाणीपुरवठा योजना वाढत्या लोकसंख्येला अपुरी पडत आहे. जलवाहिन्या जीर्ण झाल्या आहेत. तसेच कमी क्षमतेच्या जलवाहिन्या असल्याने सर्व भागांत पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. नांदेड फाट्यावरील लोकवस्त्या परिसरात खाजगी टँकरच्या पाण्यावर नागरिकांना तहान भागवावी लागत आहे.
धायरी, नर्हेसह सिंहगड रस्ता परिसरात अपुर्या पाण्यामुळे खाजगी टँकरची संख्या वाढली आहे. सोसायट्या, लोकवस्त्यांत विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. धायरी येथील भाजपचे ज्येष्ठ संघटक संदीप पोकळे म्हणाले, ’उंच, सखल भागात अनियमित पाणीपुरवठा होत आहे. पाण्याचे वितरण कोलमडले आहे. उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या बिकट होणार आहे. त्याआधीच प्रशासनाने पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करावे.’ महापालिकेच्या वतीने समाविष्ट गावांतील नवीन पाणीपुरवठा योजनांचा विस्तारित आराखडा तयार केला आहे. त्यानुसार सर्व गावांतील विस्तारित लोकसंख्येला आगामी इसवी सन 2050 पर्यंत पाणीपुरवठा करण्याची क्षमता असलेल्या पाणी योजना राबविण्यात येणार आहे. याबाबत प्रशासकीय कार्यवाही पूर्ण झाली आहे. त्यामुळे समाविष्ट गावांतील सध्या अस्तित्वात असलेल्या पाणी योजनांवर केला जाणारा खर्च वाया जाणार आहे. सुधारित पाणी योजना पूर्ण होईपर्यंत टंचाईग्रस्त भागात टँकरने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
नवीन समाविष्ट गावांत विस्तारित पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार आहे. त्याची अंमलबजावणी टप्प्या टप्प्याने करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात नर्हे, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, जांभूळवाडी व कोळेवाडी या पाच ठिकाणी नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत असून त्याची प्रशासकीय कार्यवाही सुरू आहे.
-दीपक सपकाळ, उपविभागीय अभियंता, पाणीपुरवठा विभाग, महापालिका
जुन्या जलवाहिन्या बदलण्याची मागणी
खडकवासला भाजपचे उपाध्यक्ष रूपेश घुले म्हणाले, ’काही भागात अर्धा तासच पाणी येते, तर काही भागात पाणी येत नाही. जुन्या जलवाहिन्या दोन इंची आहेत. त्या बदलून चार इंची लाईन टाकावी. गावठाण तसेच आसपासच्या लोकवस्त्यांत पाणीटंचाईची तीव—ता वाढली आहे.’ इंदूबाई बैलकर, शशिकला जाधव, कल्पना कडू, सुमन ढगारे, मीनल शेलार, लक्ष्मी गुलवे, मंदाबाई दारवटकर, मंगल महात्मे, पद्मिनी कुरनुरे आदी महिलांनी पाणीटंचाईच्या व्यथा मांडल्या.
हेही वाचा
चिपळूणमध्ये सरकारच्या आशीर्वादाने बाहेरील गुंड मागवून राडा : विजय वडेट्टीवार
नवले पुलाजवळ डंपरची प्रवासी बसला धडक; सात जण जखमी
धक्कादायक : फुटबॉल आणण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार
Latest Marathi News उन्हाळ्यापूर्वीच पाणीटंचाईच्या झळा; नांदेड, धायरी परिसरातील चित्र Brought to You By : Bharat Live News Media.
