‘हर हर महादेव’ जयघोषात अमरनाथ यात्रेला प्रारंभ

‘हर हर महादेव’ जयघोषात अमरनाथ यात्रेला प्रारंभ

बालटाल-पहलगाम पॅम्पमधून 4,603 भाविक रवाना
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जगप्रसिद्ध पवित्र अमरनाथ गुहेकडे भाविकांचा प्रवास सुरू झाला आहे. भाविकांचा पहिला जत्था शनिवारी सकाळी गंदरबल जिह्यातील बालटाल बेस पॅम्प येथून ‘हर हर महादेव’चा जयघोष करत यात्रेकरूंची पहिली तुकडी 3,880 मीटर उंचीवर असलेल्या अमरनाथ गुहेकडे रवाना झाली. 29 जूनपासून सुरू झालेला हा प्रवास 19 ऑगस्टला संपणार आहे. गेल्यावषी साडेचार लाख भाविकांनी बाबा अमरनाथाचे दर्शन घेतले होते. यंदा हा आकडा वाढण्याचे संकेत आतापर्यंतच्या नोंदणीवरून दिसून येत आहे.
4,603 भाविकांची पहिली तुकडी शुक्रवारी घाटीत पोहोचल्यानंतर काझीगुंड भागातील नवयुग बोगद्यावर स्थानिक प्रशासनाने त्यांचे स्वागत केले. लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांच्या उपस्थितीत जम्मूहून ही तुकडी रवाना झाली होती. 231 वाहनांच्या ताफ्यात हे यात्रेकरू घाटीत पोहोचले होते. तेथे त्यांचे उपायुक्त अतहर आमिर खान यांनी स्वागत केले. तसेच यात्रेकरूंसाठी सर्व चोख व्यवस्था करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
चोख सुरक्षा व्यवस्था तैनात
यात्रेवर दहशतवाद्यांचे सावट पडण्याची शक्मयता लक्षात घेता त्रिस्तरीय सुरक्षा  तैनात करण्यात आली आहे. याशिवाय भाविकांच्या सर्व बेस पॅम्पवर सीसीटीव्ही आणि ड्रोनच्या माध्यमातून 24 तास नजर ठेवली जाणार आहे. अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर खोऱ्यातील विविध मार्गांवर निर्बंध घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात एक सूचनाही जारी करण्यात आली आहे. यावेळी यात्रेसाठी 3.50 लाखांहून अधिक लोकांनी नोंदणी केली आहे. पवित्र गुहेकडे जाणाऱ्या दोन्ही मार्गांवर 125 सामुदायिक किचन बनवण्यात आले आहेत.