अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महामेळावा होणारच
मध्यवर्ती म. ए. समिती ठाम : परवानगीसाठी पोलीस आयुक्तांची भेट
प्रतिनिधी/ बेळगाव
मराठी भाषिकांना डिवचण्यासाठी कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन बेळगावच्या सुवर्णसौध येथे भरविले जाते. या अधिवेशनाला विरोध दर्शविण्यासाठी 8 डिसेंबर रोजी मध्यवर्ती म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली महामेळावा यशस्वी केला जाणार आहे. महामेळाव्यासाठी पोलीस प्रशासनाने परवानगी द्यावी, असे पत्र मंगळवारी पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांना देण्यात आले आहे. परवानगी मिळाली नाही तरी महामेळावा होणारच अशी भूमिका मध्यवर्ती म. ए. समितीने घेतली आहे.
यावर्षी कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबरपासून बेळगावमध्ये होणार आहे. प्रतिवर्षाप्रमाणे मराठी भाषिक आपला विरोध दर्शविण्यासाठी प्रति अधिवेशन म्हणजेच महामेळावा घेऊन प्रत्युत्तर देणार आहेत. मध्यवर्ती म. ए. समितीने महामेळाव्यासाठी चार ठिकाणे प्रशासनाला सुचविली आहेत. धर्मवीर संभाजी चौक, सरदार्स मैदान, धर्मवीर संभाजी उद्यान व व्हॅक्सिन डेपो ही चार ठिकाणे पोलिसांना देण्यात आली असून यापैकी एका ठिकाणी परवानगी देण्याची मागणी करण्यात आली आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नासंदर्भात न्याय मिळावा यासाठी महाराष्ट्र सरकारने 2004 साली सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. परंतु त्यानंतर 2006 सालापासून बेळगावमध्ये कर्नाटक विधिमंडळाचे अधिवेशन भरविण्यास सुरुवात झाली. वास्तविक, महाराष्ट्र सरकारने याला विरोध करणे गरजेचे होते. परंतु महाराष्ट्र सरकारने त्यावेळी बघ्याची भूमिका घेतली. महाराष्ट्र एकीकरण समिती मात्र दरवर्षी महामेळाव्याद्वारे अधिवेशनाला विरोध दर्शवित आहे.
पोलिसांना परवानगीचे पत्र देण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाने काही अटी घालून परवानगी दिली तर योग्य अन्यथा म. ए. समिती महामेळावा यशस्वी करणारच, असा विश्वास माजी आमदार मनोहर किणेकर यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. यावेळी मध्यवर्ती म. ए. समिती, बेळगाव शहर म. ए. समिती, बेळगाव तालुका म. ए. समिती तसेच खानापूर तालुका म. ए. समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महामेळावा होणारच
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महामेळावा होणारच
मध्यवर्ती म. ए. समिती ठाम : परवानगीसाठी पोलीस आयुक्तांची भेट प्रतिनिधी/ बेळगाव मराठी भाषिकांना डिवचण्यासाठी कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन बेळगावच्या सुवर्णसौध येथे भरविले जाते. या अधिवेशनाला विरोध दर्शविण्यासाठी 8 डिसेंबर रोजी मध्यवर्ती म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली महामेळावा यशस्वी केला जाणार आहे. महामेळाव्यासाठी पोलीस प्रशासनाने परवानगी द्यावी, असे पत्र मंगळवारी पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांना देण्यात […]
