वादळी वाऱ्याने मोठा वृक्ष घरावर कोसळला

वादळी वाऱ्याने मोठा वृक्ष घरावर कोसळला

बाची येथील गावडे कुटुंबावरील अनर्थ टळला : बेघर झाल्याने आर्थिक मदतीची मागणी 
वार्ताहर /उचगाव
बाची गावामध्ये मंगळवारी रात्री झालेल्या जोरदार वादळी वाऱ्याचा तडाखा बसून मोठा वृक्ष राहत्या घरावरती कोसळला. मात्र सदर वृक्ष भिंतीला टेकल्याने मोठा धोका टळला आणि घरातील पाच जणांचे जीव बालबाल बचावले. या घटनेमुळे सदर गरीब कुटुंबाचे जवळपास पाच लाखाचे आर्थिक नुकसान झाले आहे. गेल्या दोन दिवसापासून वादळी वाऱ्याचे अनेक तडाखे सातत्याने सुरू आहेत. या वादळी वाऱ्याच्या तडाख्याने बेळगावच्या पश्चिम भागातील अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. याचबरोबर घरांचे पत्रे उडण्याचे प्रकार बऱ्याच ठिकाणी झाल्याचे दिसून येत आहे.
यामध्येच बाची गावातील शांता परशराम गावडे यांच्या राहत्या घरावर मंगळवारच्या रात्री घराशेजारी असलेला मोठा वृक्ष कोसळला. मात्र या वृक्षाचा बुंधा भिंतीवरती टेकल्याने आणि या झाडाच्या अनेक फांद्या घराच्या छतावरती कोसळून पत्रे आणि छताचे मोठे नुकसानहीझाले आहे. घरामध्ये शांता गावडे, त्यांचा मुलगा मोहन गावडे, पत्नी आणि दोन मुली असा हा पाच जणांचा परिवार या घरामध्ये झोपला होता. मात्र रात्री अकस्मात झालेल्या या आवाजाने ते घाबरून उठले आणि घराबाहेर पडले. सदर वृक्ष जर संपूर्ण घरावरती कोसळला असता तर मोठा अनर्थ घडला असता.
मात्र नशीब बलवत्तर म्हणून सदर वृक्षाचा बुंधा भिंतीवरती टेकल्याने होणारा मोठा अनर्थ टळला. या घटनेचा पंचनामा तलाठ्यांनी प्रत्यक्ष येऊन पाहणी करून केली आहे. सदर घटनेमध्ये या गरीब कुटुंबाला जवळपास पाच लाखाचा मोठा आर्थिक फटका बसला असून सदर कुटुंब बेघर बनले आहे. श्रीमती शांता यांचे पती सध्या हयात नाहीत. मुलगा व छोटेसे गरीब कुटुंब असल्याने आर्थिक मदत शासनाने तातडीने करावी, अशी मागणी नागरिकांतून व या कुटुंबातर्फे करण्यात येत आहे.