युवानिधीचा 1055 जणांना लाभ

युवानिधीचा 1055 जणांना लाभ

जिल्ह्यात 12 हजार 353 जणांची नोंद : दर महिन्याला स्वयंघोषणा बंधनकारक
बेळगाव : पदवीधर विद्यार्थ्यांना अर्थसाहाय्य देणाऱ्या युवानिधीसाठी जिल्ह्यातून 12 हजार 353 जणांनी आतापर्यंत नोंद केली आहे. त्यापैकी 1 हजार 55 जणांना याचा लाभ मिळाला आहे. योजना अधिक पारदर्शक रहावी यासाठी विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात डीबीटीद्वारे निधी वर्ग केला जात आहे. राज्यात सर्वाधिक युवानिधीसाठी नोंद झालेल्यांमध्ये बेळगाव जिल्हा आघाडीवर आहे. काँग्रेस सरकारने निवडणुकीदरम्यान पाच गॅरंटी योजनांची घोषणा केली होती. त्यामध्ये अन्नभाग्य, शक्ती, गृहलक्ष्मी, गृहज्योती आणि युवानिधीचा समावेश आहे. शक्तीयोजनेला जून महिन्यात सुरुवात करण्यात आली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर चार योजनांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. 2022-23 या शैक्षणिक वर्षात पदवी आणि डिप्लोमा पूर्ण झालेले विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहेत. या अंतर्गत पदवीधर विद्यार्थ्यांना 3 हजार तर डिप्लोमाधारकांना 1500 रुपये दिले जात आहेत. बेळगाव जिल्ह्यात पदवीधर आणि डिप्लोमाधारकांची संख्या मोठी आहे. मात्र यापैकी 2022-23 सालात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. या योजनेंतर्गत दर महिन्याला भत्ता मिळवायचा असेल तर लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्यात आपण बेरोजगार आहे, पुढील शिक्षण घेत नाही आणि स्वयंउद्योग करत नसल्याची स्वयंघोषणा करणे बंधनकारक आहे. पदवी/पदव्युत्तर आणि डिप्लोमा उत्तीर्ण पात्र उमेदवारांना युवानिधी योजनेचा लाभ मिळविण्यासाठी सेवासिंधू पोर्टलवर अर्ज स्वीकृती सुरू आहे. त्याचबरोबर नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना भत्ता थेट बँक खात्यात वर्ग केला जात आहे.
विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात निधी वर्ग
आतापर्यंत जिल्ह्यातून 12 हजार 353 जणांनी नोंद केली आहे. यापैकी 1 हजार 55 जणांना भत्ता देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या थेट बँकेत निधी वर्ग करण्यात येत आहे. शिवाय अर्ज ऑनलाईन स्वीकृती सुरू आहे. सेवासिंधू पोर्टलवर अर्ज स्वीकारले जात आहेत.
– चिदानंद बाके, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी