पुणे : एक ऑक्टोबरला ललित पाटील पुण्यातील ससुन रुग्णालयातून पळून गेला होता तेव्हा हे दोन पोलीस कॉन्स्टेबल ससुन रुग्णालयातील कैद्यांसाठीच्या 16 नंबर वॉर्ड बाहेर पहारा देत होते.
नाथा काळे आणि अमित जाधव या दोन पोलीस कॉन्स्टेबल्सना अटक करण्यात आली आहे. कर्तव्यात कसूर केल्याच्या आरोपावरून या दोन पोलीस कॉन्स्टेबल्सना अटक करण्यात आली आहे.
ललित पाटील प्रकरणात आतापर्यंत अटक आलेल्या या दोन पोलीस कॉन्स्टेबलसह दहा पोलिसांना निलंबित करण्यात आलं होतं.
पुण्यातील ससून रुग्णालयातून एमडी ड्रग्जचं रॅकेट चालवणाऱ्या ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी अटक केली होती.
अटक होण्यापूर्वी ललित पाटील पोलिसांपासून दूर पळत होता. पुणे, नाशिक आणि मुंबई पोलिसांची पथकं ललित पाटीलचा पाठलाग करत होती. अखेर मुंबई पोलिसांच्या पथकानं ललितला चेन्नईमधून अटक केली.
अटकेनंतर ललित पाटीलला मुंबईतल्या अंधेरी कोर्टात सादर करण्यात आलं. त्यावेळी ललित पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाला की, “कोर्टातून रुग्णालयात घेऊन जात असताना त्याने माध्यमांच्या कॅमेऱ्यांकडे पाहात मी पळालो नाही, मला पळवलं गेल. मी कोणाकोणाचा हात आहे हे सांगेन.”
या प्रकरणी पुणे पोलिसांनी 11 ऑक्टोबरला ललित पाटीलचा भाऊ आणि ड्रग्जच्या कारखान्यातील पार्टनर भूषण पाटील याला अटक केली होती.
ललित पाटीलच्या अटकेवर महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.
“मी पळालो नाही, तर मल पळवलं गेलं,” या ललित पाटीलच्या वक्तव्यावर बोलताना फडणवीस म्हणाले, “यातून एक मोठं नेक्सस बाहेर येणार आहे आणि अनेक बोलणाऱ्यांची तोंडं बंद होणार आहेत.”
या प्रकरणावर बोलताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ड्रग फ्री महाराष्ट्र ही संकल्पना घेऊन ड्रग्जची साखळी तोडली पाहिजे असं आम्ही यंत्रणांना सांगितलं आहे. याच दरम्यान मुंबई पोलिसांना नाशिकमधल्या कारखान्याची माहिती मिळाली. त्याच्यावर त्यांनी धाड टाकली.
“वेगवेगळ्या ठिकाणी अशाप्रकारे जे काम करतात त्यांच्यावर धाडी टाकलेल्या आहेत. आता ललित पाटील हातामध्ये आलेला आहे. निश्चितपणे त्यातून एक मोठं नेक्सस बाहेर येईल. काही गोष्टी मी लगेच तुम्हाला सांगू शकत नाही. योग्य वेळी मी सांगेन. पण यातून एक मोठं नेक्सस आम्ही बाहेर काढणार आहोत.”