बांगलादेश भारताचा सर्वात मोठा भागीदार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली. याप्रसंगी बांगलादेश हा भारताचा सर्वात मोठा विकास भागीदार असून आम्ही बांगलादेशसोबतच्या संबंधांना सर्वोच्च प्राधान्य देतो, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. शेख हसीना आणि नरेंद्र मोदी यांची भेट शनिवारी सकाळी झाल्यानंतर शिष्टमंडळ स्तरावरही चर्चा पार पडली. याप्रसंगी ढाका […]

बांगलादेश भारताचा सर्वात मोठा भागीदार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली. याप्रसंगी बांगलादेश हा भारताचा सर्वात मोठा विकास भागीदार असून आम्ही बांगलादेशसोबतच्या संबंधांना सर्वोच्च प्राधान्य देतो, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. शेख हसीना आणि नरेंद्र मोदी यांची भेट शनिवारी सकाळी झाल्यानंतर शिष्टमंडळ स्तरावरही चर्चा पार पडली. याप्रसंगी ढाका आणि दिल्लीदरम्यान अनेक करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. दोन्ही देशांमधील व्यापार करारासोबतच अनेक सीमापार प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला.
द्विपक्षीय बैठकीनंतर संयुक्त निवेदनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेश हे आमचे शेजारी प्रथम धोरण, अॅक्ट ईस्ट धोरण, व्हिजन सागर आणि इंडो-पॅसिफिक व्हिजनच्या संगमावर वसलेले असल्याचे सांगितले. गेल्या वर्षभरात आम्ही संयुक्तपणे लोककल्याणासाठी बरीच कामे केली आहेत. मोंगला बंदर प्रथमच रेल्वेने जोडले गेले आहे. दोन्ही देशांत भारतीय ऊपयात व्यापार सुरू झाला असल्याचेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले. गेल्या एका वर्षात आम्ही 10 वेळा भेटलो, पण आजची बैठक विशेष आहे कारण पंतप्रधान शेख हसीना आमच्या तिसऱ्या कार्यकाळातील आमच्या पहिल्या पाहुण्या असल्याचेही त्यांनी नमूद केले.
भारत आणि बांगलादेश दरम्यान पहिली क्रॉस बॉर्डर पाईपलाईन सुरू झाली आहे. गेल्या वर्षभरात इतकी कामे मार्गी लागली आहेत. भारत बांगलादेश मैत्री उपग्रह आमच्या संबंधांना नवी उंची देईल, असे पंतप्रधान म्हणाले. दोन्ही बाजूंनी द्विपक्षीय चर्चा करण्याचे मान्य केल्याचे सांगत 54 सामायिक नद्या भारत आणि बांगलादेशला जोडतात. या माध्यमातून पाणीप्रश्न सोडविण्यासाठी दोन्ही देश गंभीर असल्याचेही पंतप्रधानांनी नमूद केले.
भारत आणि बांगलादेश दरम्यान गंगा नदीवरील जगातील सर्वात मोठा रिव्हर क्रूझ प्रयोगही यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. बांगलादेशातील तीस्ता संवर्धन आणि व्यवस्थापनासाठी एक तांत्रिक चमू बांगलादेशला भेट देणार आहे. अरबी समुद्राबाबतची आपली दृष्टी सारखीच आहे. एवढा मोठा उपक्रम केवळ एका वर्षात अनेक क्षेत्रात राबविणे हे आमच्या संबंधांची गती आणि प्रमाण दर्शवते, असेही पंतप्रधान पुढे म्हणाले. 2026 मध्ये बांगलादेश विकसनशील देश बनणार असल्याचा आशावाद व्यक्त करत पंतप्रधान मोदी यांनी हसीना यांना शुभेच्छाही दिल्या.

राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींचीही भेट
आपल्या दोन दिवसांच्या दौऱ्यात हसीना यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचीही भेट घेत त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. शनिवारी सकाळी राष्ट्रपती भवनात शेख हसीना यांच्या स्वागतासाठी रेड कार्पेट सज्ज ठेवण्यात आले होते. या दरम्यान दोन्ही देशांचे राष्ट्रगीत वाजवण्यात आले. शेख हसीना यांना गार्ड ऑफ ऑनरने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर हसीना यांनी दुपारी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची भेट घेत. संध्याकाळी राष्ट्रपती मुर्मू यांची भेट घेऊन त्या बांगलादेशला रवाना झाल्या.