त्रिपुरामध्ये शालेय विद्यार्थ्यांवर एड्सचा कहर

त्रिपुरामध्ये शालेय विद्यार्थ्यांवर एड्सचा कहर

828 विद्यार्थी आढळले एचआयव्ही पॉझिटिव्ह : अनेकांनी गमाविला जीव
वृत्तसंस्था/ अगरतळा
त्रिपुराच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना एड्स हा आजार झाल्याचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. त्रिपुरा राज्य एड्स नियंत्रण सोसायटीच्या एका वरिष्ठ  अधिकाऱ्यानुसार राज्यात 828 विद्यार्थी एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. शालेय विद्यार्थी अमली पदार्थांचे मोठ्या प्रमाणात सेवन करत असल्याने एचआयव्हीचा मोठ्या प्रमाणात संसर्ग झाल्याचे सांगण्यात आले.
आतापर्यंत 828 विद्यार्थ्यांना एचआयव्ही पॉझिटिव्ह म्हणून रजिस्टरमध्ये नोंद केले आहे. यातील 572 विद्यार्थी जिवंत आहेत. तर या धोकादायक संक्रमणामुळे 47 जणांनी स्वत:चा जीव गमावला आहे. अनेक विद्यार्थी देशभरातील प्रतिष्ठित संस्थांमध्ये शिक्षण घेण्यासाठी राज्याबाहेर गेले आहेत. राज्यातील 220 शाळा आणि 24 महाविद्यालये तसेच विद्यापीठांमध्ये इंजेक्शनच्या मदतीने अमली पदार्थांचे सेवन करणारे विद्यार्थी आढळून आले आहेत. तसेच जवळपास प्रतिदिन एचआयव्हीचे 5-7 नवे रुग्ण आढळून येत असल्याचे त्रिपुरा एड्स नियंत्रण सोसायटीकडून सांगण्यात आले.
आतापर्यंत 220 शाळा आणि 24 महाविद्यालयांची ओळख पटविण्यात आली असून तेथे विद्यार्थी अमली पदार्थांचे सेवन करत असल्याचे आढळून आले आहे. राज्यभरातील एकूण 164 आरोग्य सुविधांचा डाटा पाहिला आहे. आम्ही एआरटी केंद्रांमध्ये 8,729 लोकांना नोंदणीकृत केले आहे. एचआयव्हीने पीडित एकूण लोकांची संख्या 5,674 इतकी आहे. यातील 4,570 पुरुष तर 1,103 महिला आहेत. तर केवळ एक रुग्ण ट्रान्सजेंडर असल्याची माहिती त्रिपुरा एड्स नियंत्रण सोसायटीचे संयुक्त संचालक सुभ्रजीत भट्टाचार्य यांनी दिली आहे.
एचआयव्हीच्या वाढत्या रुग्णांसाठी अमली पदार्थांचे सेवन कारणीभूत आहे. बहुतांश प्रकरणांमधील मुले ही श्रीमंत कुटुंबांशी संबंधित आहेत. या कुटुंबांना स्वत:ची मुले अमली पदार्थाची सेवन करत असल्याचे कळेपर्यंत वेळ निघून गेलेली असते असे भट्टाचार्य यांनी सांगितले.