टीम इंडियाचा सलग दुसरा विजय

टीम इंडियाचा सलग दुसरा विजय

तिसऱ्या टी 20 सामन्यात झिम्बाब्वेवर 23 धावांनी मात : पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडी
सामनावीर वॉशिंग्टन सुंदरचे 15 धावांत 3 बळी, गिल-ऋतुराजची फटकेबाजी
वृत्तसंस्था/ हरारे
झिम्बाब्वे दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाच्या युवा सेनेने तिसरा टी 20 सामना जिंकत मालिकेत आघाडी घेतली आहे. शुभमन गिल आणि ऋतुराज गायकवाड यांच्या दमदार फटकेबाजीच्या जोरावर भारताने 182 धावांचा डोंगर रचला होता. झिम्बाब्वेचा संघ 183 धावांचा पाठलाग करताना मैदानात उतरला खरा, पण सुरुवातीपासूनच त्यांना भारताच्या गोलंदाजांनी धक्के दिले आणि यामुळेच त्यांना 23 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या विजयासह टीम इंडियाने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी विजयी आघाडी घेतली आहे. उभय संघातील चौथा सामना दि. 13 रोजी होईल.
183 धावांचा पाठलाग करणाऱ्या झिम्बाब्वेला भारताने चार षटकांत तीन धक्के दिले. त्यामुळे झिम्बाब्वेची 3 बाद 19 अशी दयनीय अवस्था आली होती. यानंतर भारताने अजून दोन विकेट्स मिळवल्या आणि झिम्बाब्वेची 5 बाद 39 अशी अवस्था केली. पण, डियॉन मेयर्स व क्लाइव मंडाडे यांनी सहाव्या गड्यासाठी 77 धावांची भागीदारी साकारली. या जोडीने फटकेबाजी करताना भारतीय गोलंदाजांची चांगलीच दमछाक केली होती पण 17 व्या षटकांत वॉशिंग्टन सुंदरने मंडाडेला बाद करत ही जोडी फोडली. मेयर्सने शानदार अर्धशतकी खेळी साकारताना 49 चेंडूत 7 चौकार व 1 षटकारासह नाबाद 65 धावा केल्या. तर मंडाडेने 26 चेंडूत 37 धावांचे योगदान दिले. मंडाडे बाद झाल्यानंतर मात्र झिम्बाब्वेला विजयापर्यंत पोहोचता आले नाही. त्यांना 20 षटकांत 6 बाद 159 धावापर्यंत मजल मारता आली. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने 3 तर आवेश खानने 2 गडी बाद केले.
हरारे स्पोर्ट्स क्लबच्या स्टेडियमवर टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांनी 67 धावांची भागीदारी करून टीम इंडियाला शानदार सुरुवात करून दिली. या मालिकेतील पहिला सामना खेळत असलेल्या जैस्वालने शानदार फलंदाजी करताना 27 चेंडूत 4 चौकार व 2 षटकारासह 36 धावा केल्या. आक्रमक खेळत असलेल्या जैस्वालला सिकंदर रजाने बाद करत भारताला पहिला धक्का दिला. दुसऱ्या सामन्यातील शतकवीर अभिषेक शर्मा या लढतीत मात्र स्वस्तात बाद झाला. रजाने त्याला बाद करत झिम्बाब्वेला दुसरे यश मिळवून दिले. शर्माने 1 चौकारासह 9 धावा केल्या.
शुभमन, ऋतुराजची फटकेबाजी
अभिषेक शर्मा बाद झाल्यानंतर कर्णधार शुभमन गिल व ऋतुराज गायकवाड यांनी संघाचा धावफलक हलता ठेवला. या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 72 धावांची महत्वपूर्ण भागीदारी साकारली. गिलने मालिकेतील दुसरे अर्धशतक झळकावले. त्याने 49 चेंडूत 7 चौकार व 3 षटकारासह 66 धावा फटकावल्या. फटकेबाजीच्या प्रयत्नात गिल 18 व्या षटकांत बाद झाला. दुसरीकडे, गायकवाडचे आपल्या टी 20 कारकिर्दीतील 5 वे अर्धशतक हुकले पण संघाला 182 धावांपर्यंत नेण्यात महत्त्वाचे योगदान दिले. गायकवाडने 28 चेंडूत 4 चौकार व 3 षटकारासह 49 धावांचा पाऊस पाडला. संजू सॅमसन 2 चौकारासह 12 धावांवर नाबाद राहिला. शुभमन गिलचे अर्धशतक, ऋतुराज व जैस्वालच्या फटकेबाजीच्या जोरावर भारतीय संघाने 20 षटकात 4 गडी गमावत 182 धावा केल्या. अखेरच्या चार षटकात भारतीय खेळाडूंनी जोरदार फटकेबाजी केली. झिम्बाब्वेकडून सिकंदर रजा व मुजारबानी यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
 
संक्षिप्त धावफलक
भारत 20 षटकांत 4 बाद 182 (यशस्वी जैस्वाल 36, शुभमन गिल 49 चेंडूत 7 चौकार व 3 षटकारासह 66, अभिषेक शर्मा 10, ऋतुराज गायकवाड 28 चेंडूत 49, संजू सॅमसन नाबाद 12, रिंकू सिंग नाबाद 1, मुजारबानी व सिकंदर रजा प्रत्येकी दोन बळी).
झिम्बाब्वे 20 षटकांत 6 बाद 159 (मेडवेरे 1, मारुमानी 13, ब्रायन बेनेट 4, डियॉन मेअर्स 49 चेंडूत नाबाद 65, सिकंदर रजा 15, क्लाइव मंडाडे 37, मसाकदजा नाबाद 18, वॉशिंग्टन सुंदर 3 तर आवेश खान 2 बळी).